दि.२४ रोजी दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ पुणे सोलापूर महामार्गावर ए.सी. ची वाहतूक करणाऱ्या सोनू ट्रान्सपोर्टचा कंटेनर नंबर एच.आर. ३८ ए डी ६४२६ ला अचानक आग लागल्याने संपूर्ण कंटेनर आणि त्यातील मुद्देमाल जळून खाक झाला आहे. तर या कंटेनरचा क्लीनर आतच अडकून पडल्याने त्याचाही यामध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. प्रिन्स राजा स्वरूप परमाल (वय २३ रा. डोंगरा कल्ला, ललितपुर ,तालुका- पाली,जिल्हा- ललितपुर,राज्य- उत्तर प्रदेश) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या क्लीनरचे नाव आहे.
तर कंटेनर चालक अकीलखान फकरूद्दिन खान, (मु पो खंडेवाला,ता.पाहडी, जि.भरतपूर राजस्थान) याने गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून हा कंटेनर चेन्नईवरून भिवंडीकडे निघाला होता. यवत जवळ कंटेनर आल्यानंतर त्याला अचानक आग लागली. यावेळी कंटेनर चालकाने क्लीनरला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाढ झोपेत असल्याने तो उठला नाही अशी माहिती मिळत आहे. यावेळी ड्रायवरने ट्रक मधून उडी मारून आपला जीव वाचवला मात्र क्लीनरला बाहेर पडता न आल्याने तो आतच जळून खाक झाला.
आयशर कंपनीच्या या कंटेनरला आग लागल्यानंतर आसपासचे आगीचे बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कंटेनर आणि आतील क्लीनर व ए.सी असा मुद्देमाल जळून खाक झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांसह सपोनि वाघ, प्रमोद शिंदे, सचिन काळे, झेंडे मेजर, कापरे मेजर यांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.
तर आबा प्रल्हाद दोरगे, अमर चोरगे, विक्रांत दोरगे, धीरज सोनवणे, समीर अन्सारी व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्योजक संदीप दोरगे यांनी ताबडतोब पाण्याचे टँकर आणि अग्निशामक बंब व क्रेन बोलवून आग आटोक्यात आणण्यात मोठी भूमिका बजावली