नारायणगाव वारूळवाडी येथील डिंबा डाव्या कालव्यात पती-पत्नीचा बुडून मृत्यू
नारायणगाव वारुळवाडी येथून गुंजाळवाडी कडे जाणाऱ्या डिंभा डाव्या कालव्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना घडली . काही महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
या बाबत माहिती अशी की, नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी शिक्षक चिराग चंद्रशेखर शेळके व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके (रा. अभंगवस्ती, वारूळवाडी) हे वारूळवाडी परिसरातील डिंभा डाव्या कालव्यालगत एक जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिरायला गेले असता ते पाण्यात बुडाले. ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली असता त्यांना पाण्यातून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
परंतु पाण्याचा वेग पाहता ते दोघेही पाण्यात बुडाले दरम्यान चिराग शेळके याचा मृतदेह काल दिनांक एक रोजी घटना घडल्यानंतर काही मिनिटातच तेथे मिळाला परंतु पल्लवी चा मृतदेह आज सकाळपर्यंत मिळाला नव्हता. मात्र कालव्याचे पाणी कमी केल्यानंतर आज दोन जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पल्लवी चा मृतदेह पाण्यात मिळाला.
दरम्यान आज सकाळपासून नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे तसेच वारुळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर व इतरांनी घटनास्थळी पल्लवी शेळके यांचा मृतदेह शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले यावेळी संतोष वाजगे, विकास तोडकरी, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पायमोडे, अजित वाजगे, सुशील सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार काळूराम साबळे, सुभाष दुबळे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेने अभंग वस्ती वारुळवाडी येथे मोठी शोककळा पसरली.