म्हैस व गाय चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव पोलीसांनी केली अटक
काठापूर बु ता. आंबेगाव येथील शेतकऱ्याची गाय, म्हैस चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पारगाव पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीची गाय, व २५ हजार रुपये किमतीची म्हैस ताब्यात घेत मूळ मालकास परत केली आहे.
काठापूर बुद्रूक येथील शेतकरी सतीश सूर्यभान ढोबळे यांच्या गोठ्यातील गाय व म्हशीची चोरी झाली होती. या बाबत पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक काम करत होते.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सराईत आरोपी नामे पद्माकर उर्फ नागेश शांताराम मोरे रा. कळंबवाड ता. मुरबाड जि.ठाणे याचेवर शिरूर, रांजणगाव पोलीस ठाणे येथे जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याने तो शिरूर परीसरामध्ये येणार असल्याची बातमी पारगाव पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा त्याचा साथीदार नरेश भाऊ मोरे रा. कळंबवाड ता. मुरबाड जि.ठाणे याने सोबत त्याचे वाहनामध्ये केला असल्याचे सांगीतले.
सदर आरोपिकडे अधिक चौकशी केली असता त्यानें फरार आरोपी नरेश भाऊ मोरे याचे राहते घराजवळ चोरी केलेली जणावरे दाखविली, ती फिर्यादी यांनी पाहून ओळखली. फरार आरोपी नरेश भाऊ मोरे याची पत्नी हिचे समक्ष दोन्ही जनावरे पंचासमक्ष ताब्यात घेत ती पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे येथे आणून मूळ मालकास परत देण्यात आली.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस ह. अजित मडके, शांताराम सांगडे, पोलीस नाईक रमेश इचके, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे यांनी केली आहे.