मुंबई – प्रतिनिधी – बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणी विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे इतके दिवस गप्प होते आज मात्र त्यांनी मौन सोडले. आपल्यावर टीका करणाऱ्यांना ठणकावत त्यांनी सांगितले की, आरोपी बाबत माहिती असणाऱ्यांना सगळेच माहित असेल तर त्यांचा आरोपींशी संबध असावेत असा पलटवार त्यांनी केला आहे.
मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. कराड यांना या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात शरणागती नंतर अटक करण्यात आली होती. त्याशिवाय, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी म्हटले की, माझ्या राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही. अंजली दमानिया या अजितदादांना भेटल्या. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवली. जे काही पुरावे दाखवलेत त्यावर अजित दादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर देतील अशी माझी अपेक्षा आहे असे धनंजय मुंडे म्हणाले. राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदिप क्षीरसागर यांना यातील आरोपी कृष्णा आंधळेंची सगळीच चांगली माहिती मिळतेय. आरोपींचे आणि त्यांचे काही संबध आहे असे म्हणावं लागेल. बातम्या पेरण्यासाठी हे सारं सुरू असून बीड शिवाय इतर काहीही सुरू नाही असे मुंडे म्हणाले. आपण काय खरं काय खोट हे तपासून घ्यावं. संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा त्यांना फासावर लटकवलं पाहिजे या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल नाही असेही मुंडे यांनी सांगितले.