बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला | संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत केले आंदोलन | एकाने स्वतःला पिंजऱ्यात घेतले कोंडून
नारायणगाव येथून जवळच असलेल्या हिवरे तर्फे नारायणगाव येथे किसन लक्ष्मण भोर या ५३ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हल्ला केल्यामुळे हिवरे तर्फे नारायणगाव व परिसरातील ग्रामस्थ संतापले. आणि या घटनेचा निषेध म्हणून बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे व माजी आमदार अतुल बेनके यांनी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला मात्र सातपुते यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.
यामुळे संबंधित ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम नारायणगाव येथे सुरू होता आंदोलकांना उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पुण्याकडे जाऊन द्यायचा नाही असा आंदोलकांचा प्रयत्न असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा दुसऱ्या मार्गे पुण्याकडे रवाना केला. दरम्यान बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी भूमिका घेत येथील सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात स्वत:ला डांबून घेऊन कुलूप लावून घेतले.
दरम्यान हे आंदोलन पुणे नाशिक महामार्गावरील अयोध्या हॉटेल समोर झाल्यानंतर आंदोलक नारायणगाव पोलीस स्थानकात आले. तेथेही उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज आंदोलकाच्या वतीने करण्यात आला दरम्यान येथेही राजू भोर यांनी पिंजऱ्यातून बाहेर येण्यास नकार दिला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, माजी आमदार अतुल बेनके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक जगदेव पाटील, वनक्षेत्रपाल ठोकळ यांनी विनवणी करूनही राजू भोर पिंजऱ्यातून बाहेर उतरले नाही, याप्रसंगी संतोष वाजगे, अजित वाजगे, विकास नाना तोडकरी, सुरज वाजगे, बाळा वाव्हळ, ईश्वर पाटे, अक्षय खैरे,नितीन भोर, विकास भोर, पप्पू भूमकर, निरंजन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.