महिंद्रा सुप्रो मालवाहू गाडीची पल्सरला जोरदार धडक – १९ वर्षीय युवकाचा मृत्यू.
जनप्रवास: प्रतिनिधी
जांबूत : शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी येथील अष्टविनायक रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री २२ एप्रिल रोजी सुमारे ९.३० वाजता घडली.
गणेश रामदास शितकल रा. कवठे येमाई, वय १९ हा त्याच्या पल्सर दुचाकी वरून मलठणकडे जात असताना, समोरून भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा सुप्रो मालवाहू वाहनाने चुकीच्या साईडने जाऊन जोराची धडक दिली. या अपघातात गणेशला गंभीर दुखापत झाली व त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून वाहन टाकून फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताची फिर्याद कैलास बबन कुळके वय ३५, रा. कवठे येमाई यांनी दिली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.