कोल्हापूर, दि. २ जुलै :चंदगड आणि गडहिंग्लज परिसरात निर्जनस्थळी वृद्ध व्यक्तींवर हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगार टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. या टोळीने वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना त्यांना गंभीर मारहाण केली होती.
पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकाने सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
गोपनीय माहितीवरून मिळालेल्या सूचनांनुसार, गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याजवळ सापळा रचून देवेंद्र दिंगबर पताडे (वय १९) व बाळू परशराम नाईक (वय २८) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ओपो व व्हीओ कंपनीचे दोन मोबाईल, १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकी असा एकूण २,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी वृद्ध महिलेच्या घरी पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड झाल्यावर तेथील वृद्ध पुरुष व एक लहान मुलगा मदतीला आले, त्यांनाही कोयत्याने मारहाण करून आरोपींनी पलायन केले. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाणे आणि गडहिंग्लज पोलीस ठाणे अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास चंदगड पोलीस ठाणेकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.