कोल्हापूर, दि. 5 (जिमाका): सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी राधानगरी धरणावर नव्याने बसवण्यात येणाऱ्या रेडिएल गेटच्या जागेची पाहणी केली. तसेच सर्व्हिस गेट क्रमांक 3, 4 व 5 ला हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी महाजनकोचे जुने जल विद्युत केंद्र (पावर हाऊस) पुन्हा सुरु करण्याबाबत जलसंपदा व महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, महाजनकोचे पावर हाऊस इन्चार्ज श्री. जाधव व श्री. कानेकर, राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येतो. महापुराची कारणे पडताळून उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून एमआरडीपी या प्रोजेक्ट मधून सध्या सर्व्हेचे काम सुरु आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राधानगरी धरणाच्या अस्तित्वात असणाऱ्या सेवा दरवाजांना हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्यात येणार आहे, जेणेकरुन धरणात येणाऱ्या पाण्याचा महापुरापूर्वीच विसर्ग करुन अतिरिक्त पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा धरणात साठा करून ठेवणे शक्य होईल व अतिवृष्टीवेळी धरणातून विसर्ग राहणार नाही, अशी उपाययोजना करण्यासाठी धरणाच्या सेवा द्वाराना हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्यात येणार आहे.
धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अस्तित्वात असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांच्या सांडव्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त सांडव्याच्या ठिकाणी तीन रेडिएल गेट बसवण्यात येणार आहेत. हे गेट स्वयंचलित दरवाजा व मुख्य धरण यांच्या मधील जागेत बसवण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्यावेळी धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे शक्य होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली.