– न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला सुरुवात
आज चार वाजता होणार कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घघाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश व महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार असून, हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
यानिमित्ताने कोल्हापूर नगरी या ऐतिहासिक घटनाक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून या सोहळ्याची सर्व स्तरातील जनतेला प्रतीक्षा आहे.
दरम्यान, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन दुपारी 3.45 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यानंतर मोटारीने मेरी वेदर स्कूल मैदान येथे सायंकाळी 4 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी न्याय व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
………………….
50 वर्षांच्या लढ्याचे यश
गेल्या पन्नास वर्षापासून सर्किट बेंचची मागणी होत आहे. यासाठी कोल्हापूर बार असोसिएशन यांच्यासोबत कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी पक्षकार संघटना यांनी आंदोलन केली अखेर पन्नास वर्षाच्या लढायला आता यश आले आहे.
…………….