23.5 C
New York
Tuesday, August 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

लिकिंगने खत विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

लिकिंगने खत विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

— मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कृषी विभागाला सूचना

— सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल उभारण्यासाठी पाहणी करा

— मंत्री हसन मुश्रीफ यांचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला निर्देश

— सर्किट बेंच उद्घाटनाच्या नियोजनबद्ध सोहळ्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक.. !

कोल्हापूर/प्रतिनिधी

ऊस व इतर पिकासाठी कोल्हापूर जिल्ह्यात युरिया, डीएपी व इतर खतांची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज वाढल्याने या खतासोबत लिंकिंग स्वरुपात अन्य कोणतेही खत अथवा मागणी व्यतिरिक्त इतर कोणत्याही निविष्ठांचे लिंकिंग आढळल्यास विक्रेता व खत उत्पादक कंपनीवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

कागल, गडहिंग्लज, उत्तुर भागातील विविध प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता नजीर नाईकवडी, कागल – राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तसेच अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या मागील बाजूला असलेल्या सांडव्यावर पूल बांधणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करुन पुढील कार्यवाही करावी. त्याचबरोबर कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली पूल व गडहिंग्लज तालुक्यातील काळभैरी देवालय रस्त्यावरील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने येथेही भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्री  मुश्रीफ म्हणाले, योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयासाठी उत्तूर ग्रामपंचायतीने 15 एकर जागा दिली आहे. तसेच वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रासाठीही 5 एकर जागा देण्यात येत आहे. उत्तूर मध्ये क्रीडांगणासाठी गायरानातील 5 एकर जागा मिळण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले असता याबाबत तहसीलदारांनी सकारात्मक कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केल्या.

सर्किट बेंच उद्घाटनाच्या नियोजनबद्ध सोहळ्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुक.. !

मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या लोकार्पण सोहळ्याला विविध भागातून न्यायमूर्ती, न्यायाधीश, वकील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा सोहळा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध व भव्य पद्धतीने पार पडला, यासाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार यांनी बैठकीत माहिती दिली.

लिंकिंग विरहित खताचा पुरवठा होत असल्याची खात्री करा

लिंकिंग विरहीत खताचा पुरवठा होत असल्याची खात्री कृषी विभागाने करावी. कोणत्याही प्रकारचे लिंकिंग अथवा कोणत्याही खताचा तुटवडा जाणवत असल्यास कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रार नोंद करण्याबाबत व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या सर्व सहकारी संघांच्या शाखांना सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, असे नियोजन करा. युरिया व डीएपी संरक्षित साठा वितरण झाल्याप्रमाणे दोन्ही खतांची उचल होवून ही खते शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याची तपासणी करा.

मागणीनुसार खत उपलब्ध करा

मिश्र खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्याने जिल्ह्यातील सर्व मिश्र खत उत्पादकांना कच्चा माल म्हणून लागणारी सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, असे नियोजन करा. जिल्ह्यात मागणीनुसार खत उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खतांच्या साठ्याबाबत माहिती दिली. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!