पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा
– पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश
• अलमट्टी व हिप्परगीच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा
• गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा
• मुख्यालय सोडू नका, जीवित हानी होवू नये, यासाठी दक्षता घ्या
• भूस्खलनामुळे नागरिकांना हानी होणार नाही, याची खबरदारी घ्या
• पूर बाधित व मोडकळीस आलेल्या घरांतील नागरिकांचे वेळेत स्थलांतर करा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
राज्यात पावसाचा जोर वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातही सतत पाऊस पडत आहे. यामुळे राधानगरी व काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा. मुख्यालय सोडू नका. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकारच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील पूरस्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, धरण परिसरात व जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस आणि धरणांतून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यासाठी नदीकाठच्या नागरिकांपर्यंत वाढत्या पाणी पातळीची माहिती वेळेत पोहोचवा. पुरामुळे नागरिकांचे नुकसान होवू नये, यासाठी चोख नियोजन करा. पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवून नियोजन करावे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार ठेवा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पुरेसे मनुष्यबळ व साधनसामग्री तयार ठेवावी. पूर परिस्थितीत महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य, कृषी, महावितरण, पोलीस विभागासह इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून आपापल्या जबाबदाऱ्या अधिक काळजीपूर्वक व चोखपणे पार पाडाव्यात. भूस्खलनाचा धोका असणारी गावे, मार्गांवर लक्ष द्या. आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत वेळेत सूचना पोहोचवा. पुराचे पाणी असणाऱ्या मार्गावर नागरिक वाहन चालवणार नाहीत, यासाठी असे मार्ग बंद ठेवा. गरज भासल्यास या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, कोयना व अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गरज भासल्यास अलमट्टीतून आणखी विसर्ग वाढवण्याबाबत अलमट्टी धरण प्रशासनासोबत संपर्क साधण्यात येत आहे. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रबर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंगसह आवश्यक ती साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. तसेच 200 आपदा मित्र व सखी, 220 पोलिस सेवा संघटना यांच्यासह 1700 स्वयंसेवक तयार करण्यात आले आहेत. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी 488 निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत, असे सांगून जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी केलेले नियोजन व उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी माहिती दिली.
पूर परिस्थितीत शहर परिसरात पुरामुळे बाधित होणारे भाग, व नागरिकांची संख्या, नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी तयार करण्यात आलेली निवारागृहे, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने केलेली तयारी याबाबतची माहिती कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना सतर्क करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, ग्रामीण भागात बंद असणारे मार्ग, पुरामुळे मार्ग बंद असल्यामुळे शाळांबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व या अनुषंगाने माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली.
पुराचे पाणी असणाऱ्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त देण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले.