सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वीज सुरक्षेला प्राधान्य द्या
– गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांर्भियाने उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, याकरता गणेश मंडळानी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीज पुरवठ्याच्या वीजदरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, होर्डिंग, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
अशी घ्या काळजी
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. वीजपूरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्युट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांतीक अपघात होण्याची शक्यता आहे. जवळच्या वीज खांबावरून किंवा वीज वाहिन्यांवरून अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानीचा संभाव्य धोका अधिक आहे. वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. ठिकठिकाणी जोड असणारी किंवा तुटलेल्या किंवा लूज वायर वापरू नयेत. वायारीस जोड देण्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप वापरावा. भक्तांच्या सूरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये.
आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा
आपत्कालीन स्थितीत गणेश मंडळांनी महावितरणला संपर्क साधावा. याकरता संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. आपात्कालीन स्थितीत महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912 / 1800-212-3435 / 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.