मल्हारपेठेत अतिवृष्टीमुळे घर कोसळले,२५ लाखांचे नुकसान
—-तीन जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार
–भिंतीच्या ढिगाऱ्यात गाढला गेला मोरे कुटुंबियांचा संसार
— चार जण अडकले होते दगड, विटांच्या ढिगाऱ्यात
–दोन घरांच्या पडझडीमुळे मोठे नुकसान
कोल्हापूर/ प्रतिनिधी
मल्हारपेठ ता पन्हाळा येथील रंगराव दतू मोरे यांच्या घरावर पावसामुळे व वाऱ्यामुळे लगतच्या घराची भिंत कोसळून त्यांचे संपूर्ण राहते घर जमीनदोस्त झाले. यामुळे पंचवीस लाखांचे नुकसान झाले .तर ढिगाऱ्याखाली सापडून घरातील तीन जखमी झाले आहेत .ही घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजता घडली. यामध्ये रंगराव दत्तू मोरे (वय . 65 ) , राधिका युवराज मोरे (वय 40) , समिक्षा नंदकुमार कापसे (वय -21 ) हे तिघे जखमी झाले आहेत . जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
यावेळी कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य राबविले .तर कळेचे मंडल अधिकारी सुहास घुगे , तलाठी मिठारी यांनी ही भेट देवुन आवश्यक ती मदत पुरविली . घटनेचा प्राथमिक पंचनामा तलाठी मिठारी यांनी केला आहे. संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यामुळे मोरे कुटुंबियांचा संसार भिंतीच्या ढिगाऱ्यात सापडला आहे.