पाच रुग्णालयांना महापालिकेची नोटीस
तत्काळ रुग्णस्तलातील करण्याचे आदेश
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील पूरबाधीत क्षेत्रातील पाच रुग्णालयांना रुग्ण स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या आहेत.
नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसरातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल तसेच कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल या पाच रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
नोटिशीत संबंधित रुग्णालयांना विद्यमान रुग्णांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नव्या रुग्णांना दाखल न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास व रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रशासनावर राहणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरीकांनी पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.