कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यभरात विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोल्हापुरातही मोठ्या संख्येने कोपरासभा मिसळपे चर्चा अशा बऱ्याच पद्धतीने मतदारांशी संवाद साधला जातोय.यात कार्यकर्त्यांना काही जेवणावेळी आणि पाकीट पोच करण्यावर जोर असतो. दर सभेवेळी कार्यकर्त्यांना जेवणावेळींशी विशेष सोय करण्यात येते. हे काही नेत्यांकडून छुप्या पद्धतीने या सर्व सोयी केल्या जातात. मात्र कोल्हापुरात एका सभेदरम्यान थेट सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना हॉलमध्ये जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. सर्वांनी जेवणासाठी त्या हॉलमध्ये जावे, अशा सूचना करण्यात आल्या. यामुळे तेथे उपस्थित असणारे काही पदाधिकारी ही अचंबित झाले. या सभेची जिल्ह्यात सगळीकडेच चर्चा होत आहे.
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार प्रणिती शिंदे यांची सभा उजळाईवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या शेवटी सभेचा समारोप करताना सूत्रसंचालकाने थेट माईक वरून सर्वांचे आभार मानत ,जेवणाची सोय सरस्वती हॉल येथे करण्यात आली आहे असे पुकारले. हे ऐकताच स्टेजवर उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना खुणवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत मतदारांना जेवणावेळी घातल्या जातात याची चर्चा सर्वत्र होत असते. पण थेट सभेच्या स्टेजवरून अशा सूचना दिल्या गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. मतदारांना आमिष दाखवले आणि आचारसंहितेचा भंग केला म्हणून उमेदवार आणि आयोजकांवर कारवाई होईल अशी शक्यता आहे. या घटनेची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे असेही समजते. एकंदरीतच निवेदकाने केलेल्या या चुकीचा फटका काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना फायद्याचा ठरतो की तोट्याचा हे मात्र येणारा काळच ठरवेल.