अहमदनगर – बाळासाहेब सदाशिव काळे आणि त्यांची पत्नी शांताबाई काळे या वृद्ध दाम्पत्याला आपल्या मुलांकडून झालेल्या अत्याचाराचा सामना करावा लागत आहे.पोटच्या मुलांनीच त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले असून,कष्टाने कमावलेली शेतजमीन आणि घर हिसकावून घेतले आहे.जवळपास आठ महिन्यांपासून हे वृद्ध दाम्पत्य वणवण भटकत असून त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
यासोबतच त्यांना मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीव मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब काळे आणि शांताबाई काळे यांनी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर पोलीस अधीक्षक, अहील्यानगर यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की, काढून घेतलेली शेतजमीन आणि राहत घर परत मिळावे,मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून संरक्षण मिळावे,संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी. बाळासाहेब काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही उपोषणाला बसू.आठ महिन्यांपासून आम्ही हाल सहन करत आहोत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
वृद्ध दाम्पत्याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर वृद्ध दाम्पत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.