निरगुडसर येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडला ; वनविभागाकडून अंत्यसंस्कार
निरगुडसर (थोरातमळा) ता. आंबेगाव येथील सुनील रामचंद्र थोरात यांच्या घरापाठीमागील ऊसाच्या शेतात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाकडून या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमर थोरात यांच्या ऊसाची सरी फोडण्याचे काम सुरू होते.त्यावेळी सरी मध्ये बिबट्याचे बछडे मृतावस्थेत आढळून आले,असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पुजा थोरात व विक्रम मेंगडे यांनी परिमंडळ वनअधिकारी यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर येथील वनरक्षक अश्विनी डफळ व वनपाल प्रदिप कासारे यांनी, रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबट्याचा बछडा ऊसाच्या च्या कडेला मृतावस्थेत पडला होता. मृत बिबट्या बछडा हा मादी असून, त्याचे वय साधारण पाच ते सहा महिने असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी सांगितले. बिबट्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वनअधिकारी यांनी केली.व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. बिबट्याचा बछडा दोन बिबट्यांच्या परस्पर झालेल्या लढतीत मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
मागील आठवड्यापासून दोन बिबट्यांचा थोरात मळा परीसरात वावर असुन दोन दिवसांपूर्वी येथील एका कुत्र्याची शिकार बिबट्याने केली आहे.मृतवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या बछड्याच्या शोधात त्याची आई मादी येवू शकते व कोणावरही हल्ला होऊ शकतो त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य जयश्री थोरात यांनी केली आहे.