निरगुडसर, टाव्हरेवाडी येथे बंद घरात चोरी ; सोन्या, चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले
निरगुडसर ता. आंबेगाव येथील वळसे मळा येथे दोन आलिशान बंगल्यांमध्ये चोरी झाली असून चोरट्यांनी बंगल्यातील बंद कपाटे फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील लॉकरमधील असलेले दागिने, रोख रक्कम चोरून नेली आहे.
निरगुडसर येथील वळसेमळा येथे रेवजी गेनभाऊ वळसे पाटील यांच्या सार्थक बंगल्यात चोरी झाली आहे. तसेच प्रवीण शिवाजी वळसे पाटील यांच्याही बंगल्यात चोरी झाली असून चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने दरवाजांचा कडी कोंयडा तोडून बंगल्यात प्रवेश करत चोरी केली आहे.

रेवजी गेनभाऊ वळसे पाटील व त्यांचे कुटुंबीय एका लग्नकार्यासाठी दि. २३ रोजी मुंबई या ठिकाणी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्यात चोरी केली आहे. रेवजी वळसे व त्यांचे कुटुंबीय पहाटे तीन वाजता घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले चोरट्यांनी घरातील सर्व कपाटे फोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मशीन हे देखील चोरून नेले आहे. तसेच रेवजी वळसे पाटील यांच्या शेजारीच असलेल्या प्रवीण शिवाजी वळसे पाटील यांच्या बंगल्यात देखील चोरी झाली आहे. प्रवीण वळसे पाटील हे कामानिमित्त पुणे येथे वास्तव्याला असतात त्यांचा बंगला बंद असल्याने त्यांच्या बंगल्यातून किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळताच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील यांनी घटनेची माहिती गावातील नागरीकांना देऊन सगळ्यांना सतर्क राहण्यास सांगितले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास पारगाव सुरू आहे . तसेच मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथे बंद घरात चोरी झाली असून अकरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरलेला आहे. या बाबत भाऊसाहेब प्रल्हाद टाव्हरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.