अवयवदानामुळे मृत्यूनंतरी इतरांना जीवन देण्याची संधी
जिल्हा परिषदेत अवयवदान जनजागृती कार्यशाळा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतरी इतरांना जीवन देण्याची संधी देते, अशा उपक्रमामुळे समाजात विश्वास, जागरुकता आणि सकारात्मकता निर्माण होईल. असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांनी व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची शपथ घेऊन हा संदेश आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावा तसेच प्रत्येक पंचायत समितीत अशा कार्यशाळाचे आयोजन करून ग्रामपातळीवर जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सार्वनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून अंगदान-जीवन संजीवनी अभियानांतर्गत दिनांक 3 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर अवयवदान पंधरवडा साजरा कला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद नूतन सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणाले, आपले शरीर अनमोल आहे. स्वतःच आरोग्य स्वत: जपा आणि समाजासाठी एक जबावदार नागरिक म्हणून अवयवदानाच्या चळवळीत सहभागी व्हा, अवयव दान काळाची गरज असल्याने एकाद्या व्यक्तीचे जीवदान दिल्या सारखे आहे. जीवनात येऊन आपण काहीतरी मोठे काम आपल्या हातून होईल , याचे समाधन जीवनभर आपल्या सोबत राहणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.
या कार्यशाळेत सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप राऊत यांनी अवयवदानाचे सामाजिक, वैद्यकीय व कायदेशीर पैलू याबाबत सविस्तर मार्गदशन केले. अवयव प्रत्यारोपणाचे प्रकार मुत्यपूर्व मृत्युपश्चात अवयवदानाची प्रक्रिया, तसेच या क्षेत्रातील कायदेशीर तरतूदी स्पष्ट केल्या.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) माधुरी परीट, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, डॉ. सुशांत रेवडेकर तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवयवदान करण्यासाठी https://notto.abdm.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
———————————