सर्किट बेंचसाठी महापालिकेकडून युद्ध पातळीवर कामे
— 85 लाखाच्या निधीतून डांबरीकरण, धोकादायक दहा झाडे हटवली
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी महापालिकेकडून आवश्यक असणारी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्किटबीनच्या परिसरात असणारे रस्त्यांची डांबरीकरण करण्यात येत असून यासाठी 85 लाखांचा विशेष निधीही खर्च केला जात आहे. याचबरोबर शहरभर स्वच्छता, सर्किट बेंचच्या दारातील मुख्य रस्त्यांचे पेव्हर पद्धतीने डांबरीकरण, झाडांच्या फांद्यांची छाटणी, गटर्स स्वच्छता व पॅचवर्कच्या कामांना गती मिळाली आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सी.पी.आर सिग्नल चौक ते तहसिलदार कार्यालय हा मुख्य रस्ता, तसेच खानविलकर चौक, अदित्य कॉर्नर, धैर्यप्रसाद चौक, ताराराणी चौक येथे पेव्हर पध्दतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी 80 लाखांचा निधी खर्च होत असून सर्किट बेंच परिसरात काँक्रिटीकरण व गटरसाठी 5 लाख निधी खर्च करण्यात येत आहे. विद्युत विभागाकडून शाहू टोल नाका ते मेरीवेदर ग्राऊंड या मार्गावरील स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. ही मोहीम उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
……………..
धोकादायक झाडे हटवली
उद्यान विभागामार्फत वादळी वाऱ्यामुळे न्यायालय परिसरात उन्मळून पडलेला पितमोहर वृक्ष काढण्यात आला असून या परिसरातील वारसा इमारती जवळील असणारी 3 उल्टाअशोक, 1 ऑस्ट्रेलियन बाभळ, 3 भेरली माड, 1 बकुळ, 1 महोगनी, 1 बदाम अशी धोकादायक झाडे वृक्षप्राधिकरण समितीच्या मान्यता घेऊन काढण्यात आलेली आहेत.
…………..
९५० कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम
स्वच्छता विभागाकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर 950 कर्मचाऱ्यांच्या मदतीने फुटपाथ सफाई, विभाजक जवळी खरमाती, तनकट, व्हिपहोल मधील माती काढून या परिसराची स्वच्छतेची कामे सुरू आहेत. यामध्ये संभाजीनगर ते कळंबा साई मंदिर, शाहू टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक, डीएसपी ऑफिस चौक ते खानविलकर पंप ते सर्किट हाऊस चौक, धैर्यप्रसाद चौक ते भगवा चौक कसबा बावडा ते सीपीआर चौक, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी टोल नाका, क्रशर चौक ते वाशी नाका चौक, सीपीआर चौक ते भाऊसिंगजी रोड आदी भागांचा समावेश आहे. तसेच सर्किट बेंच परिसर व मुख्य न्यायमूर्तींचे निवासस्थान परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.