अखेर सर्किट बेंच मुळे “त्या” रस्त्यांना न्याय
– सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी ‘फटाफट’ डांबरीकरण
– वर्षभर खड्ड्यांकडे दुर्लक्ष
गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना महापालिकेकडून दिलासा मिळाला तो केवळ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे. सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, तसेच सीपीआर चौक ते दसरा चौक आणि भाऊसिंगजी रोड मार्गे या मार्गांवर डांबरीकरणाची धांदल सुरू झाली आहे. हेच रस्ते अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाले होते, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून, मान्यवरांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला अचानक ‘जाग’ आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सीपीआर चौक व आसपासच्या मार्गांवरील खड्डे बुजवणे, डांबरीकरण व रस्त्यांची ‘सौंदर्यीकरण मोहीम’ सुरू झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गांवर मोठमोठे खड्डे असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेकदा अपघातही घडले, मात्र महापालिकेकडून कोणतीही तत्काळ कारवाई झाली नाही. सरन्यायाधीशांच्या आगमनामुळे केवळ दोन दिवसांत रस्ते चकचकीत होऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेची कार्यतत्परता केवळ व्हीआयपींसाठीच का? वर्षभर आम्हीच का खड्ड्यांमध्ये गाड्या मोडून घेऊ? आमच्या तक्रारींना महत्त्व न देता, मान्यवरांच्या स्वागतासाठी रस्त्यांना ‘मेकओव्हर’ देणे, ही दुहेरी नीती असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मान्यवरांच्या दौऱ्यानंतर पुन्हा हेच रस्ते खड्डेमय होणार नाहीत याची शाश्वती मिळावी, अशी मागणी देखील होत आहे.