तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात
– शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अनोखे आंदोलन
— शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शिवारात उभारला तिरंगा
–स्वातंत्र्य दिनी राजू शेट्टी यांनी साजणी येथे केले आंदोलन
कोल्हापूर/ प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्यावतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी “तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात “ हे अभिनव आंदोलन करून शेतक-यांनी ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा ऊभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साजणी ता. हातकंणगले व निमशिरगांव ता. शिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना व तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग शेतक-यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गामुळे पुढील जवळपास ९० वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे. मुठभर उद्योगपतींना व त्यांच्या व्यवसाय वृध्दीला डोळ्यांसमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जात आहे. देशातील १५० कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकविणा-या शेतक-यांवर वरवंटा फिरविला जात आहे.
कॅाम्रेड गिरीष फोंडे बोलताना म्हणाले, देशातील सामान्य नागरीकांच्यावर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी -फडणवीस सरकारने बेजार केले आहे. देशातील शेतक-यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकविण्याची ताकद आहे हे शेतक-यांनी दाखवून दिले आहे. यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व १२ जिल्ह्यातील शेतक-यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमुठ केली असून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे.
यावेळी साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील , बी.डी.पाटील , शिवगोंडा पाटील , अरूण मगदूम , कृष्णात मसुरकर तसेच निमशिरगांव येथील मा. सरपंच शिवाजी कांबळे ,शांताराम कांबळे , सुधाकर पाटील , विक्रम चौगुले , दिनकर पाटील , यांचेसह दोन्ही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.