डॉ. खोत यांच्या पुस्तकामुळे जनसामान्यात होमिओपॅथीची विश्वासाहर्ता वाढेल
— डॉ . किशोर नारड
– होमिओपॅथी हीच जीवन संजीवनी पुस्तकाचे प्रकाशन
सांगरुळ/वार्ताहर
डॉ.दौलत खोत यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णाना दिलासा दिला आहे . त्यांनी लिहिलेल्या होमिओपॅथी हीच जीवन संजीवनी या पुस्तकाच्या माध्यमातून जनसामान्यात होमिओपॅथी उपचार पद्धतीची माहिती होण्याबरोबरच या उपचार पद्धती बाबत विश्वास निर्माण होण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास नागपुरचे होमिओपॅथ तज्ञ डॉ किशोर नरड यांनी व्यक्त केला .
खोत होमिओपॅथिक क्लिनिकच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व डॉ. दौलत खोत यांनी लिहिलेल्या होमिओपॅथी हीच जीवन संजीवनी या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .यावेळी बोलताना डॉ. नरड पुढे म्हणाले डॉ खोत यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून होमिओपॅथीचा जन्म व प्रगतीचा इतिहास त्याचे हेतू आणि उद्दिष्टे कोणत्या व्याधी या उपचाराने बऱ्या केल्या जाऊ शकतात याचे विस्तृत विवरण केले असल्याचे सांगितले .
यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर वसंतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीस डॉ. दौलत खोत व डॉ.अश्विनी खोत यांनी उपस्थित पाहुणे व मान्यवरांचे स्वागत केले .
प्रास्ताविक करताना डॉ .दौलत खोत यांनी डॉ .प्रफुल विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली खोत हॉस्पिटलची वाटचाल सुरू आहे . होमिओपॅथिक उपचार पद्धतीच्या बाबतीतील गैरसमज दूर करणे तसेच शास्त्रशुद्ध होमिओपॅथी काय आहे याबरोबरच होमिओपॅथिक उपचार पद्धतीचे विस्तृत स्वरूप याबाबत माहिती या पुस्तकात दिली असल्याचे सांगितले .यामध्ये होमिओपॅथीचा शोध व प्रसार, होमिओपॅथिक औषधांची कार्यपद्धती, होमिओपॅथिक चिकित्साचे अमर्याद कार्यक्षेत्र,होमिओपॅथी मध्ये माहिती घेण्याची प्रक्रिया,होमिओपॅथी विषयी सामान्य लोकांमध्ये असलेले प्रश्न व गैरसमज ,होमिओपॅथिक औषधे घेताना घ्यावयाची काळजी व होमिओपॅथिक औषधाचे फायदे याचे विवेचन केले आहे .
यानंतर डॉ.किशोर नरड यांच्या हस्ते खोत हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले .होमिओपॅथी ही जीवन संजीवनी या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. किशोर नरड शरंगधर देशमुख केरबा खोत आनंदराव पवळ यांच्या हस्ते केले .यावेळी खोत हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते .