पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका
– पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन
• पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री अबिटकर म्हणाले, मागील दोन दिवस जिल्ह्यात विशेषतः धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
पावसाबरोबरच अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यातील पाण्याच्या विसर्गाचाही जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर मोठा परिणाम होतो. याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक शासनामध्ये समन्वय साधला जात आहे. अलमट्टीतून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकार सोबत समन्वय साधत आहेत. तसेच जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारीही धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सातत्याने आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाऊस वाढला तरी नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर न पडता सुरक्षित रहावे. पुराचे पाणी असणाऱ्या मार्गावर वाहन चालवू नका. पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडू नका. पुराच्या पाण्यात सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.