निष्ठावंताच्या श्वासाबरोबरच निष्ठेची दौड थांबली
– दसरा चौक ते दिंडनेर्ली सद्भावना दौड यंदा नाही
– राजीवजी सूतगिरणीवर राजीव गांधींच्या प्रतिमेचे पूजन
कृष्णात चौगले/ कोल्हापूर
स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर देशातील पहिली सद्भावना दौड दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केली . दरवर्षी 20 ऑगस्ट राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी कोल्हापूरचा दसरा चौक ते राजीवजी गांधी सूतगिरणी दिंडनेर्ली अशी भव्य सद्भावना दौड व शेतकरी मेळावा पी एन पाटील यांच्या संयोजनातून आयोजित केला जात होता. काँग्रेस पक्ष व गांधी घराण्यावरील निष्ठा आणि राजीव गांधी यांच्यावरील प्रेमापोटी हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवला .पी एन पाटील यांचे निधन झाले .काँग्रेसच्या निष्ठावंत नेतृत्वाचा श्वास थांबला आणि त्याबरोबरच ही निष्ठावंताची निष्ठेची दौड सुद्धा थांबली .चालू वर्षी पी एन पाटील यांनी सुरू केलेली ही सद्भावना दौड झाली नाही. केवळ राजीवजी सूतगिरणी कार्यस्थळावर स्वर्गीय राजीव गांधी यांची प्रतिमापूजन करून जयंती साजरी करण्यात आली.
ऑगस्ट महिन्यात कितीही पाऊस असला तरी पी एन पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दौडमध्ये सामील होत होते .काँग्रेस पक्षाचे राज्य आणि देश पातळीवरील अनेक मोठे नेत्यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती ठेवून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम या दौड मधून होत होते . कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने या दौडमध्ये सामील होत होते . अखंडितपणे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लाभत असल्याने पी एन पाटील आणि राजीवजी सद्भावना दौड हे कोल्हापूर जिल्ह्यात एक समीकरण तयार झाले होते .
पी. एन. पाटील यांनी दिंडनेर्लीमध्ये आमदार होण्यापूर्वीच सुतगिरणी स्थापन करुन तरुणांच्या हाताला काम दिले होते. या सुतगिरणीला राजीव गांधी यांचे नाव दिलेच, पण गेली ३० – ३१ वर्षांपासून राजीव गांधींच्या जयंतदिनी कोल्हापूर ते दिंडनेर्ली सद्भभावना दौड आयोजित करुन आदर्श प्रस्थापित केला.
जवळपास पूर्वीचा सांगरूळ आणि आताचा करवीर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी सहा निवडणुक लढवल्या. त्यापैकी चार निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला .पण पराभवानंतरही त्यांनी कधी ही सद्भावना दौड थांबवली नाही कोल्हापूर जिल्हा काँग्रेसध्येच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात गेल्या पाच दशकांपासून संयमी, शांत, सुसंस्कृत स्वभावाने आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून आपल्या प्रतिभेचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला होता.
काँग्रेसकडून सद्भावना दौड
शहर आणि जिल्हा काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्य सद्भावना दौड काढण्यात आली. सकाळी १० वाजता राजर्षि शाहू महाराज समाधीस्थळ (नर्सरी बाग) येथून सद्भावना दौड सुरुवात झाली. ही दौड सीपीआर चौकातून सुरू होऊन दसरा चौक – व्हीनस कॉर्नर – दाभोळकर कॉर्नर – वटेश्वर महादेव मंदिर – राजीव गांधी पुतळा येथे सांगता झाली.
