माधुरी हत्तीच्या संगोपन केंद्रासाठी वनताराच्या पथकाची नांदणीतील जागेची पाहणी
— वनताराकडून हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार
नांदणी / प्रतिनिधी
माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय व अभियंता विभागाने बुधवारी नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज व विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी केली. यावेळी मठाने दाखविलेल्या जागेवर चांगल्या पध्दतीने सर्व सुविधायुक्त हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली.
पेटाच्या तक्रारीनंतर चुकीचे व बेकायदेशीर कागपत्रांचा आधार घेऊन उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदणी मठाचा हत्ती वनतारा येथील केंद्रात पाठविण्यात आला होता. यानंतर कोल्हापूर जिल्हयात माधुरी हत्ती परत करा या मागणीसाठी जनक्षोभ रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदणी मठाच्या जागेत वनताराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानंतर बुधवारी वनतारा जामनगर येथील वैद्यकीय विभाग व इतर सुविधासाठी बांधकाम विभागाचे तज्ञ याप्रमाणे वनताराच्या तीन पदाधिका-यांनी जागेची पाहणी केली. मठाने अद्यावत हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी ६ एकर जागा दाखविली असून सदर जागेवर वनताराच्या मार्गदर्शनाखाली सेंटर ऊभारणे सहज शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर ठिकाणी हायड्रो थेरपी तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.
नांदणी परिसरातील हवामान हत्तींना अत्यंत चांगले असल्याची माहिती वनताराच्या वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. यावेळी मठाचे मठाधिपती भट्टारक महाराजांनी ६ एकर जागेत नांदणी मठाच्या हत्तीबरोबर सांगली , कोल्हापूर व सीमाभागातील हत्तींच्यावर सोशलायझेशनासह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय याठिकाणी करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.