पुरालेखागार कार्यालयाच्या संवर्धनाचा आराखडा सादर करा
— जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हापूर/ प्रतिनिधी
पुरालेखागार कार्यालयाच्या संवर्धनाचा आराखडा सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापुरातील इतिहास तज्ञ, संशोधक व अभ्यासकांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात प्राचार्य डॉ. विलास पोवार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळासह पुरालेखागार हुजूर रेकार्ड ऑफिस व पीडब्लूडी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच कोल्हापूर पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक दिपाली पाटील व संशोधक सहाय्यक सर्जेराव वाडकर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी हुजूर रेकॉर्ड ऑफिस हे १८६५ च्या दरम्यान बांधण्यात आलेली ब्रिटिशकालीन हेरिटेज वास्तू असून याची जपणूक करत त्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी पुरालेखागार कार्यालयाचा स्वतंत्र मार्ग पूर्वी प्रमाणेच ठेवून नवीन तहसील कार्यालयाच्या चार चाकी वाहनांच्या पार्कींग करीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटलायझेशन त्वरीत पूर्ण करावे याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
वैभवराज राजेभोंसले ह्यांनी संस्थान काळात १९३१ रोजी कोल्हापूरमध्ये हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले त्याचे नोटिफिकेशन याच कार्यालयातून शोधून ते आम्ही मुंबई हायकोर्टास ऐतिहासिक संदर्भीय ठोस पुरावा म्हणून दिला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हायकोर्ट होते हे सिद्धच झाले. यामुळे सर्किट बेंच मागणीला बळकटी मिळाल्याचे सांगितले. आदिलशाही काळापासूनची ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती ताराराणी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्सल कागदपत्रे ते जुन्या काळातील नागरिकांच्या वंशावळी अशी अनेक विविध कागदपत्रे येथे जतन केले जातात. त्यामुळे या वास्तूची चोख सुरक्षा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. फिरोज शेख यांनी ऐतिहासिक दस्तावेजांचे क्लाऊड स्टोरेज झाल्यावर राज्यपातळीवर संशोधकांना, अभ्यासकांना कनेक्टिव्हिटी देण्यात यावी, अशी मागणी केली. इतिहास संशोधक विकास नाईक, प्रा. उत्तम वडिंगेकर, प्रा. चंद्रशेखर काटे, इतिहास संशोधक व मोडी तज्ञ प्रशांत दळवी ह्यांनी संशोधकांना स्वतंत्र अभ्यासिकेची मागणी केली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर यांनी कोल्हापूर पुरालेखागार संबंधित सुरु असलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
फायर ऑडिटनुसार त्वरीत उपाययोजनेचे आदेश देत स्वतंत्र अभ्यासिका मंजूर करत असल्याचे सांगितले. जुने वायरींग नवीन करण्याचे व डिजिटलायझेशन त्वरीत पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत अनेक सुविधा व मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित सचिवांशी संपर्क करून पाठपुरावा करण्याचे मान्य केले. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. कोल्हापूर पुरालेखागार वहिवाट पूर्वीप्रमाणेच ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी स्वतः तहसील कार्यालयाच्या बांधकाम ठिकाणी भेट देणार आहेत.
कोल्हापूर पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक दिपाली पाटील आणि संशोधक सहाय्यक सर्जेराव वाडकर यांनी रेकॉर्ड ऑफिसमधील दस्तावेजांच्या मायक्रोफिल्मिंग बाबत व इतर रेकॉर्ड्सबाबत यावेळी माहिती दिली.