वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसतानाही आलेल्या रुग्णावर उपचार करून त्याला औषधे लिहून देत फि स्वरूपात पैसे स्वीकारून अवैद्य वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई केली असून या डॉक्टरांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक १९/११/२०२४ रोजी तक्रारदार हे मंचर येथील हरीरूप डेंटल क्लिनीक येथे दातांचे उपचारासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या डॉ. हरिष खामकर यांच्या पत्नी दिपमाला हरिष खामकर यांचेकडे कोणतीही वैदयकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना देखिल त्यांनी तक्रारदार यांचेवर उपचार करून त्यांना त्यांचे लेटरहेडवर औषध लिहून देवून त्यांचेकडून फि स्वरूपात १२०० रूपये घेतल्याची लेखी तक्रार संबंधित रुग्णाने तालूका आरोग्य अधिकारी पंचायत समिती घोडेगाव व गटविकास अधिकारी आंबेगाव यांचेकडे करत सदर बोगस डॉक्टरांचे विरुध्द कारवाई करण्याबाबत मागणी केली होती. लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी तालूका आरोग्य अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने गटीत केलेल्या चौकशी समीतीने सदर घटनेबाबत दिनांक २८/११/२०२४ रोजी प्रत्यक्ष जावून चौकशी केली असता हरिरूप डेंटल क्लिनीक मंचर या ठिकाणी डॉ. हरीष खामकर व सौ दिपमाला हरिष खामकर रा. मंचर ता. आंबेगाव यानी संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायदयासाठी सौ दिपमाला हरीष खामकर यांनी त्यांचेकडे वैदयकीय व्यवसाय करणेबाबतची कोणतीही वैध पदवी व नोंदणीकृत प्रमाणपत्र नसताना त्यांनी तक्रारदार यांचेवर उपचार केले असून त्यास डॉक्टर हरीष खामकर यांनी सहकार्य करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत डॉक्टर हरिष खामकर व सौ दिपमाला हरिष खामकर यांचेविरूध्द तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांचे लेखी तक्रारीवरून मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहे